Live Surgery Workshop
लाईव्ह सर्जरी कार्यशाळा उत्साहात संपन्न डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र पिंपरी, पुणे व पिंपरी चिंचवड अस्थिरोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय “लाईव्ह सर्जरी कार्यशाळा” उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत ११० अस्थिरोगतज्ञ उपस्थित होते. अस्थिविकाराच्या ६ गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यावेळी करण्यात आल्या. अनुभवी तज्ञांकडून अस्थिरोग शस्त्रक्रियेच्या थेट प्रक्षेपण (लाईव्ह सर्जरी) कार्यशाळेची पिंपरी चिंचवड मधील ही पहिलीच वेळ होती. शस्त्रक्रियेतील बारकावे, विविध टप्पे, तज्ज्ञांची मते, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, अनुभवाचे आदान प्रदान, मूल्यमापनात्मक अभ्यासासह तज्ज्ञांनी थेट प्रक्षेपणाद्वारे लाभ घेतला व अतिशय सुस्पष्ट प्रक्षेपणामुळे सहभागी डॉक्टरांना शस्त्रक्रिया समजून घेणे जास्त सुकर झाले. शस्त्रक्रियेसाठी कौशल्य विकसित करणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
डॉ. डी. वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ.यशराज पाटील यांचे प्रमुख सहकार्य लाभले. या कार्यशाळेत नाशिकचे प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. विजय काकतकर, सोलापूरचे प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. प्रदिप कोठाडीया, पुण्याचे प्रसिद्ध फुट व ॲंकल तज्ञ डॉ. संपत डुंबरे-पाटील, तसेच पिंपरी चिंचवड मधील प्रसिद्ध डॉ. शाम शिंदे व डॉ. एस. प्रशांथ यांनी स्वतः शस्त्रक्रिया करून उपस्थितांना मार्गदर्शन केले व लोकमान्य हॅास्पिटल निगडी येथील डॉ. आशिष सुर्यवंशी यांनी सुद्धा परिसंवादात भाग घेतला.
या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे एस भवाळकर, शैक्षणिक विभागाच्या संचालिका डॉ. पी. वत्सला स्वामी मॅडम, डॉ. निर्मल ढुमणे(संघटना-अध्यक्ष), डॉ. अभिजीत महादार(संघटना-सचिव), डॉ. रत्नपारखी (संघटना-माजी अध्यक्ष) डॉ. स्वप्नील भिसे ( POS- सचिव), डॉ. राहुल साळुंखे (एचओडी ऑर्थो), डॉ. संजय साळवे व डॉ. हेमंत पाटील यांची उपस्थिती लाभली.